नारायणगाव : सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजविण्यावर बंदी घातलेली असताना वारूळवाडी येथील पुणे-नाशिक महामार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर डीजे वाजविणाऱ्यांवर कारवाई करीत डीजे व वाहन असा ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. असे असताना डीजेच्या आवाजामुळे त्रास होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नारायणगावचे पोलीस हवालदार सुजात अली इनामदार, शंकर भवारी, सुयोग लांडे, शरद सुरफुले, सुवर्णा गायकवाड यांनी मंगल कार्यालयात जाऊन पाहणी केली. नीलेश बबन ताजणे (रा. आळे, ता. जुन्नर) यांच्या मालकीची स्वरावली डीजे सिस्टिम आणि वाहन (४ लाख रुपये) पोलिसांनी जप्त केले. त्यांच्यावर भा.दं.वि. कलम १८८ मुंबई कायदा व मोटर वाहन कायदा ३९/१९२ नुसार कारवाई केली. (वार्ताहर)ही कारवाई करू नये, यासाठी पोलिसांवर काही व्यक्तींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी दबावाला न जुमानता कायदेशीर कारवाई केली. यासंदर्भात सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे, की सध्या शालेय परीक्षेचा कालावधी सुरू असल्याने व काही ज्येष्ठ नागरिकांना या डीजेच्या कर्कश आवाजाचा त्रास होत असल्याने व सर्वोच्च न्यायालयाने डीजे वापरावर बंदी घातली असल्याने ही कारवाई केली आहे.
डीजे वाजविणाऱ्यांवर वारूळवाडी येथे कारवाई
By admin | Published: April 18, 2016 2:52 AM