पिंपरी : ‘डमी’ शिक्षकावर शिकविण्याचे काम सोपवून फुकटचा पगार घेणाऱ्या थेरगाव येथील महापालिका शाळेतील शिक्षकाचे प्रताप विद्यार्थ्यांमधील भांडणाच्या घटनेमुळे उघडकीस आले. सुभाष कांबळे असे त्या शिक्षकाचे नाव असून, प्रशासनाने काय कारवाई केली, असे विचारले असता, महापालिका शिक्षण मंडळात अगोदरच शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे निलंबनाऐवजी दंड घेऊन बदलीची कारवाई करणेच उचित ठरेल, अशी भूमिका घेतल्याचे शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी चिंचवड येथील शाळेला अचानक भेट दऊन केलेल्या पाहणीत संदीप शेळके या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्याच्या सत्र परीक्षेची उत्तरपत्रिका न तपासताच गुण देऊन टाकल्याचे निदर्शनास आले होते. त्या वेळी चिंचवड येथील शाळेतून त्या शिक्षकाची नेहरूनगरला बदली करण्यात आली. शिक्षण मंडळाच्या कारवाईचे स्वरूप असेच असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. निलंबित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दर तीन महिन्यांनी यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची आढावा बैठक घेण्यात येते. त्यानुसार आढावा समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत फौजदारी गुन्हे दाखल असलेल्या ११ पैकी गटरकुली रविकुमार आवाड यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. उर्वरित १० अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अद्यापही न्यायालयात खटला सुरू असल्याने त्यांचे निलंबन कायम आहे. ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे, एका कर्मचाऱ्यावर लाचखोरीचा आरोप आणि १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना गंभीर स्वरूपाच्या तक्रार प्रकरणात निलंबित केले आहे. फौजदारी गुन्हा दाखल असलेल्यांमध्ये जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, आरोग्य निरीक्षक दिलीप वाधवानी, क्रीडा शिक्षक रवींद्र कांबळे, रंगमंच मदतनीस मनेश कापसे, सफाई कामगार नवनाथ तेलंगे, राहुल पवार, तुकाराम पावसे, वॉर्ड बॉय गंगाराम देव, शैलेश जाधव, मजूर राजेश रजपूत, कैलास फुगे यांच्या प्रकरणांचा आढावा घेतला. १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
डमी शिक्षकावर बदलीची कारवाई
By admin | Published: August 26, 2014 5:04 AM