खडकवासला : धरण साखळीतील खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमणांवर आज पाटबंधारे विभागाच्या वतीने करवाई करण्यात आली. धरणाच्या पुढे संरक्षण विभागाचे संरक्षीत क्षेत्रातील दहा एकर क्षेत्रातील अतिक्रमण काढण्यात आले. विधानसभेत अनेकदा या अतिक्रमणासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
सिंहगड रस्त्यावर खडकवासला येथील केंद्रिय विद्यालयासमोरील पाटबंधारे विभागाच्या पाच एकर क्षेत्रावर अनेक वर्षांपासून असलेल्या गोठ्याचा तसेच संरक्षण विभागाचे संरक्षित क्षेत्रातील आणि पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या पाच एकर क्षेत्रावरील अतिक्रमण काढण्यात आले. पाटबंधारे विभागाच्या मालकीचे आणि संरक्षण विभागाचे संरक्षीत क्षेत्रातील हा पट्टा असल्याने अनेकवेळा विधानसभेत सदर अतिक्रमणासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या विषयी कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून सदर अतिक्रमणामुळे खडकवासला धरण क्षेत्रातील पाणलोट क्षेत्राची हानी झाली होती. या कारवाईत उपअभियंता रघुनाथ व्यवहारे, खडकवासला धरण शाखेचे अभियंता राजेंद्रकुमार क्षीरसागर यांनी सहभागी झाले होते. सरपंच सौरभ मते यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे अतिक्रमण कारवाईत कोणतीही अडथळा आला नाही. ग्रामीण पोलीसांच्या वतीने तीन पोलीस उपनिरीक्षकांसह ६० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.