- लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : जनआंदोलन संघटनेच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या वन विभागातील वनजमिनीवर करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव व प्रांताधिकारी कल्याणराव पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर वन परिक्षेत्रात शुक्रवारी कारवाई करण्यात आली. जवळपास ५० घरे मोडून काढण्यात आली. या कारवाईत वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, जिल्ह्यातील भोर, दौंड, जुन्नर वन विभागातील अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या २ युनिटचे जवान, असे एकूण ७०० जन या कारवाईत सहभागी झाले होते. या वेळी जुन्नरच्या डीवायएसपी जयश्री देसाई, तहसीलदार पाटील, उपवनरक्षक अर्जुन म्हसे, सहायक वनरक्षक वाय. पी. मोहिते, ओतूर वनक्षेत्र अधिकारी एस. एस. रघतवान, नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता. कारवाईबद्दल विशेष माहिती देताना उपवनरक्षक अर्जुन म्हसे म्हणाले, ‘‘आंबेगव्हाण येथे जनआंदोलनाच्या वतीने १० झोपड्या, पाचघर येथे ४, पिंपरी पेंढार येथे ३६, उदापूर येथे २२ झोपड्या वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आल्या होत्या. या झोपड्या हटविण्यात आल्या. त्यासाठी २० जेसीबी, २० ट्रॅक्टर वापरले गेले. वन परिक्षेत्रातील सर्वांत मोठी कारवाई पिंपरी पेंढार येथील जांभळपटाजवळील घाडगेपटात जी आदिवासी समाजातील वनक्षेत्राच्या हद्दीतील जमिनीवर भेंड्यांची (मातीच्या विटा) व कौलारू घरे बांधली होती त्यांची संख्या वन विभागाच्या माहितीनुसार ३६, कौलारू मातीची व वाशांची पक्की घरे होती. परंतु, कार्यवाही करताना ही संख्या ५० घरांपर्यंत होती. शुक्रवारी दुपारी साडेतीनला या ठिकाणी ही कार्यवाही करण्यात आली. येथे जाण्यासाठी रस्ताही नव्हता. तेव्हा जेसीबीच्या साह्याने प्रथम रस्ता तयार केला. तेथील घरातील माणसांना बाहेर काढण्यात आले. त्यांना त्यांचे सामानही घेण्यास सांगितले. काही जण घरात सामान धान्य ठेवून तसेच निघून गेले होते. या कारवाईची काही जणांना अगोदरच कुणकुण लागली होती; त्यामुळे ते सामानासह निघून गेले होते. - या कारवाईत ४ जेसीबी, ४ ट्रॅक्टर डीवायएसपी जयश्री देसाई, तहसीलदार पाटील, प्रांताधिकारी कल्याण पांढरे, उप वनरक्षक अर्जुन म्हसे सहायक वनरक्षक वाय. पी. मोहिते, ओतूर वनक्षेत्रपालएस. एस. रघतवान, १०० कमांडो, २५० पोलीस, २५० वन विभागाचे कर्मचारी अश एकूण ७०० जणांनी ही कारवाई केली.परिसराला छावणीचे स्वरूप परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलीस, वन विभागातर्फे राज्य राखीव दल पाहून ग्रामस्थांना काय झाले, हे प्रारंभी समजत नव्हते; परंतु वन विभागातील अतिक्रमणे काढण्यासाठी ही कारवाई आहे, हे समजले तेव्हा तेथेही प्रेक्षकांची गर्दी झाली. याचप्रमाणे पाचघर आंबेगव्हाण येथेही कारवाई करण्यात आली.