पुणे: वारजेतील जुना जकात नाका परिसरातील अतिक्रमित एकूण सहा दुकानांत कारवाई करून सुमारे तीन हजार चौ फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. कालच्या आंबील ओढा परिसरातील कारवाई ताजी असताना आज पुन्हा केलेल्या या कारवाईमुळे कालच्या घटनेची लोकांना आठवण झाली. आजची कारवाई ही मात्र व्यावसायिक दुकानांवर झाली आहे.
वारजे मध्ये महापालिकेच्या समाजकल्याण विकास कार्यालय समोर अनेक बेकायदा टपर्या मागील दहा बारा वर्षापासून टाकून ठेवण्यात आल्या होत्या. अनेकदा नोटिसा देऊनही येथील अतिक्रमण धारक टपऱ्या काढत नव्हते. मुख्य रस्त्यावरील जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याने आता ही कारवाई करण्यात आली. असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
सकाळी अकराच्या सुमारास दोन जेसीबीसह महापालिकेचे तीन कनिष्ठ अभियंता, उपअभियंता दोन पोलीस उपनिरीक्षक व सुमारे तीस जणांचा फौजफाट्यासह महापालिकेचे अतिक्रमण पथक तेथे पोहोचले. त्यांनी लागलीच कारवाईस सुरुवात केली. तासभर चाललेल्या आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या या कारवाईचे स्थानिकांनी स्वागत केले.