सोलापूर रस्ता, पदपथावरील अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडी होऊन अपघात सदृशस्थिती निर्माण होत असल्याबाबत ‘लोकमत’ने मागील आठवड्यापासून आवाज उठविला होता. त्याची दखल घेत महापालिका, हडपसर पोलीस आणि वाहतूक पोलीस प्रशासनाने सोमवारी सायंकाळी सोलापूर रस्त्यावरील टोलनाका ते वैदूवाडी चौकादरम्यान कारवाई करून अतिक्रमणे हटविली.
सोलापूर रस्त्यावर हडपसर-गाडीतळ ते गांधी चौकादरम्यान भाजीवाले, फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पदपथावर दुकानदारांनी वाढीव काम केल्यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करता येत नव्हती. तसेच दुकानासमोर पदपथासमोर वाहने उभी केली जात असल्याने स्थानिक नागरिकांसह सर्वांनाच त्रासदायक परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे अतिक्रमणावर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती.
------------------
सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालणारे, तसेच हॉटेल, बार यांच्यावर कारवाई करून आतापर्यंत 18 लाख रुपये दंड वसूल केला आहे. तसेच रविवारी एका दिवसात 80 हजार रुपये दंड आकारला गेला. फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, पथारीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रस्त्यात उभे राहू नये, तसेच दुकानदारांनी पदपथ नागरिकांसाठी खुले ठेवावेत, अन्यथा कारवाई केली जाईल.
-सोमनाथ बनकर, सहायक आयुक्त, पालिका
----------------------------
हडपसर गांधी चौक ते गाडीतळ महानगरपालिका अतिक्रमण खात्याने कारवाई केली. हजारो भाजी विक्रेते रस्त्यावर बसतात. ते आमच्या संघटनेचे सदस्य नाहीत. बनावट पथारी व्यावसायिकांनावर कारवाई करणे आवश्यक आहे. अधिकृत परवानाधारक व्यावसायिक व्यवस्थित जागी बसतात. ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांचे पुनर्वसन करायला हवे. अन्यथा आंदोलन करू.
-मोहन चिंचकर,
अध्यक्ष- पथारी व्यावसायिक पंचायत, हडपसर
----------