पुणे : मुंबई येथे विषारी दारूमुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईची हालचाल केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने पोलिसांनी कारवाई केली. मात्र, तरीही शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावठी दारूचा महापूर सुरूच असल्याचे दिसून येत आहे़ याबाबत ‘लोकमत’ने राज्यभर स्टिंग आॅपरेशन करून गावठी दारूची सर्रास विक्री होत असल्याचे उजेडात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले़ काही ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्याचे दावेही केले होते़ तरीही अनेक ठिकाणी गावठी दारूची विक्री सर्रास सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहे़ पुणे शहरातील वारजे माळवाडी, धनकवडी, मांजरी परिसरात सर्रास दारू विकली जात असल्याचे दिसून आले़ रामनगर बनले तळीरामांचे आगार वारजे माळवाडी पोलीस ठाण्यांतर्गत अनेक ठिकाणी गावठी दारू, फुगे विकण्याचे धंदे जोरात सुरू आहेत. या ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर अनेक हॉटेल, बार, तसेच ढाब्यावरदेखील परवाना नसताना दारू विक्री केली जाते. काही हॉटेलमध्ये नामवंत कंपन्यांच्या नावाने बनावट मद्य विकत असल्याचे प्रमाणदेखील अधिक आहे.या भागात सोसायट्यांबरोबर मोठ्या प्रमाणात रामनगर, विठ्ठलनगर, आकाशनगर, सहयोगनगर, गोकुळनगर, बीडीपी परिसर या भागात व इतर अनेक वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिक राहतात. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा येथे मजूरवर्ग व अंगमेहनतीची कामे करणारा कष्टकरी समाज मोठ्या प्रमाणात राहत असल्याने त्यांना विदेशी खर्चिक मद्य परवडत नाही. त्यामुळे त्यांचा ओढा साहजिकच देशी दारू किंवा त्याहूनही स्वस्त गावठी दारू पिण्याकडे वळतो.वारज्यातील रामनगर वसाहतीचा पसारा मोठा आहे. या ठिकाणी अनेक भागात हातभट्टीवर दारू मिळते. मैदानातच तीन-चार ठिकाणी दारूचे फुगे विक्रीस आहे. संध्याकाळच्या वेळी या भागात मद्यपींचा घोळकाच असतो. भागिरथीनगरकडून गणेशपुरीला जाणाऱ्या रस्त्यावरही दारू विक्रीस आहे. गोकुळनगर व विठ्ठलनगरच्या वरच्या बाजूस पठारावरदेखील हातभट्टीचा धंदा तेजीत आहे. या ठिकाणी काही वर्षापूर्र्वी हातभट्टीवर दारू गाळण्याचा धंदा जोरात सुरू होता. आता मात्र लोकवस्ती वाढल्याने सहसा असे प्रकार होत नाहीत. याशिवाय आकाशनगरच्या वरच्या डोंगराकडील बाजूस, तसेच कर्वेनगर येथे नदीकाठाजवळ हातभट्टीची दारूविक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ही दारू डोंगरावर जंगलात, नदीकाठी अशा कुठल्याही ओसाड किंवा निर्जन ठिकाणी विक्रीसाठी ठेवली जाते. त्यामुळे या ठिकाणी मद्यपी पोचतात, मात्र उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी पोचत नसल्याने या प्रकारांवर अंकुश राहिलेला नसल्याचे दिसते. कालवा रस्त्यावर एका नामांकित शाळेपासून हाकेच्या अंतरावर अवैध दारूविक्री चालते. याचा त्रास या रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, युवती व विद्यार्थ्यांना होत आहे. याशिवाय महामार्गावरील चांदणी चौकापर्यंतच्या अनेक हॉटेलांत परवाना नसताना विदेशी मद्यविक्री होत असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.पिंपरीत बनावट मद्य तयार करणारे त्रिकूट -वृत्त/३
कारवाईचा फार्स; हातभट्ट्या सुरूच
By admin | Published: July 20, 2015 3:40 AM