पुणे : यंदा खरीप हंगाम सुरू झाला असून, पावसाने दडी दिल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६१ टक्के म्हणजे, १६९३ कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. परंतु, अद्यापही अनेक राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून कर्जवाटप करण्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी बँकांनी कर्जवाटप करताना टाळाटाळ केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
खरीप हंगाम सुरू झाला, तरी हजारो शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज मिळाले नाही. सध्या देशावर कोरोनाचे संकट असताना शेकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही, तर सर्वसामान्य व गरीब शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडू शकते. आतापर्यंत १६९३ कोटींचे वाटप झाले. त्यात सर्वांत मोठा वाटा म्हणजे ७७ टक्के कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने दिले आहे.
दर वर्षी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच पीक कर्जवाटप करण्यास सुरुवात होते. परंतु, कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे करावे लागलेल्या लाॅकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात कर्जवाटप सुरू होताना अनेक मर्यादा आल्या. त्यात दर वर्षीच खासगी आण राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्जवाटप करताना अनेक वेळा टाळाटाळ केली जाते. यामुळेच सध्या खरीप हंगाम सुरू झाला, तरी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले.
-----------------
राज्य शासन व नाबार्डने पुणे जिल्ह्यासाठी सन 2021-22 वर्षांत पीक कर्ज वाटपासाठी खरीप हंगमासाठी 2 हजार 758 कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी आता पर्यंत 1693 कोटी म्हणजे 61 टक्केच पीक कर्जांचे वाटप केले आहे.
- पुणे जिल्ह्यासाठी खरीप हंगमासाठी पीक कर्जांचे उद्दिष्ट: 2758 कोटी
- आतापर्यंत एकूण पीक कर्जवाटप : 1683 कोटी (61 टक्के)
- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने वाटलेले पीक कर्ज : 1373 कोटी
------
कमी कर्जवाटप केल्यास कडक कारवाई
जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी लोटला, तरी अद्याप ही केवळ ६१ टक्केच पीक कर्जवाटप झाले आहे. या वर्षी शंभर टक्के पीक कर्जवाटप करण्याचा प्रयत्न आहे. यात काही बँकांनी कमी पिक कर्जवाटप केले आहे. अशा सर्व बँकांच्या झोनल मॅनेजरला मिटिंगला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कमी कर्ज वाटप करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी