पुणे : शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच, पैशाअभावी काही रुग्णालये अशा रुग्णांवर उपचार करण्यास नकार देत आहेत़ त्यामुळे उपचारास नकार देणाऱ्या रुग्णालयांची तक्रार महापालिकेकडे आल्यास संबंधित रुग्णालयांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले़
स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना ‘शहरी गरीब योजनेंतर्गत’ मुक्यरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराच्या उपचारासाठी ३ लाख रुपये उपचार खर्चास मान्यता देण्यात आली़ दरम्यान, आजच्या बैठकीतील निर्णयाचे आदेश महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या १४० खाजगी रुग्णालयांपर्यंत जाईपर्यंत काही कालावधी जाणार असला तरी, या सर्व खासगी रुग्णालयांनी लागलीच या निर्णयाची अंमलबजावणी करावी व या आजारावर उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णाला नाकारू नये, असेही रासने यांनी सांगितले आहे़
----------------------
शहरात दोनशेहून अधिक रुग्ण
कोरोनामुक्त झाल्यावर म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने गाठलेले शहरात साधारणत: दोनशे रुग्ण असून, शहरातील विविध २२ रूग्णालयांमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ यामध्ये ससून रूग्णालयांतच या आजारावर उपचार सुरू असून, महापालिकेच्या दळवी रूग्णालयात या आजारासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे़ तर ससूनमध्ये आत्तापर्यंत १०२ रूग्ण या आजाराचे दाखल झाले असून, यापैकी ५० टक्क्यांहून अधिक रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे़
-----------------