पुणे : महापालिकेमध्ये बांधकाम, पाणीपुरवठा, पथ आदी विभागांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी तसेच कर्मचार्यांची बदली केल्यास त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकार्यांवर राजकीय दबाव आणला जातो. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नामी शक्कल लढविली आहे. यापुढे महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेने २००४ मध्ये याबाबत एक ठराव केला होता. कोणत्याही अधिकारी व कर्मचार्याने बदलीसाठी राजकीय दबावतंत्र वापरल्यास त्याच्यावर कारवाई करावी, असे ठरावामध्ये नमूद करण्यात आले होते. या ठरावाचा तब्बल १३ वर्षांनंतर आधार घेऊन त्याचे आदेश काढण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या बदली आदेशामध्ये याबाबतचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. माननीयांनी त्याला आक्षेप घेऊन अतिरिक्त आयुक्तांना टार्गेट केले होते. जीएसटी लागू झाल्याने कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करू नयेत, असा ठराव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीने मंजूर केला होता. मात्र प्रशासनाने या ठरावाची पर्वा न करता त्याच दिवशी कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामुळे राजकीय पदाधिकारी आणि प्रशासनात चांगलेच खटके उडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोणी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याला थेट कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी दिली. आयुक्त कुणाल कुमार व राजकीय पदाधिकाºयांमध्ये बदल्यांवरून होत असलेल्या वादामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांना मध्यस्थी केली होती. तरीही राजकीय पदाधिकारी व प्रशासनातील कलगीतुरा थांबताना दिसत नाही.
बदलीसाठी दबाव टाकल्यास कारवाई; पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:53 AM
महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत.
ठळक मुद्देमुख्य सभेच्या ठरावानुसार होणार शिस्तभंगाची कारवाई महापालिकेच्या मुख्य सभेने २००४ मध्ये याबाबत केला होता एक ठराव