पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फायदा घेत शहराच्या मध्यवस्तीसह उपनगरांमध्ये रस्ते उखडून ठेवण्यात आले आहेत. संचारबंदी असतानाही जलवाहिनी टाकणे, ड्रेनेज लाईन टाकणे, केबल्स टाकणे आदी कामांमुळे वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे. खोदाईची कामे पूर्ण करून हे रस्ते ३१ मे पूर्वी पूर्ववत करण्याची अट घालण्यात आलेली आहे. या मुदतीमध्ये कामे पूर्ण न झाल्यास ठेकेदारांवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या तोंडावर शहरात सर्वत्र रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत होणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना अपघातांचा सामना करावा लागू शकतो. पालिकाच्या पथ विभागाने यावर्षी १५० किलोमीटर रस्ते खोदण्यास परवानगी दिलेली आहे. हे काम देखील वेळेत पूर्ण करावे लागणार आहे. शहरात वेगवेगळ्या कंपन्या आणि ठेकेदारांना खोदाईसाठी परवानगी देताना ३१ मेपूर्वी खोदाई पूर्ण करण्याची अट घालण्यात आलेली आहे. आली आहे. मात्र, शहराच्या जवळपास सर्वच भागात खोदाई सुरूच आहे. त्यामुळे काम पूर्ण होणार की रस्त्यांवर भले मोठे खड्डे तसेच राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
---/---
जी कंपनी खोदाईचे काम करीत आहे त्यांनीच दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. उखडलेल्या डांबरी रस्त्यावर सिमेंट क्रॉक्रिटने दुरुस्ती केली जात आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खोदाईनंतर केलेला रस्ता खचल्याचेही समोर आले आहे.