पुणे : मुलाने आंतरजातीय विवाह केल्याने समाजातून बहिष्कृत केलेल्या एका व्यक्तीला साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल अपमानित करण्यात आले. जीवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ करण्यात आली. त्यांना समाजातून बहिष्कृत केल्याप्रकरणी जातपंचायतीच्या पंचांविरूद्ध दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी खडकी येथे राहाणा-या एका 69 वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून अर्जुन रामचंद्र जानगवळी, हरिभाऊ बाळाप्पा हिरणवाळे, चंद्रकांत उर्फ बाळू हरिभाऊ औरंगे यांच्यासह दोघांवर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फियार्दीमध्ये नमूद केल्याप्रमाणे फियार्दी यांच्या मुलाने आंतरजातीय विवाह केला होता. त्यामुळे त्यांना समजाजातुन बहिष्कृत करण्यात आले होते. त्याविरुद्ध हे प्रकरण पोलीस ठाणे व न्यायालयात गेल्यानंतर प्रकरण मिटले होते. दरम्यान, फिर्यादीच्या जवळच्या नातेवाईकाच्या मुलाचा साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी २७ नोव्हेंबर रोजी अरण्येश्वर परिसरात गेले होते. तिथे समाजातील वरिष्ठ पंचमंडळी उपस्थित होती.
या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले असताना कसे बोलावले? अशी विचारणा पंचांनी चुलत मेव्हण्यांना केली. हे कुटुंब इथे असेल तर आम्ही साखरपुडा होऊ देणार नाही. या कार्यक्रमाला अरण्येश्वर पंच मंडळी मान्यता देणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न जातीबाहेर केल्यामुळे आमच्या कार्यक्रमात त्यांना येणे बंद केले आहे. त्यामुळे साखरपुड्याचा कार्यक्रम थांबविण्यात आला. त्यांना आम्ही टिळा देणार नाही. त्यांना सोडून आम्ही इतर लोकांना टिळा देऊ. आम्हाला कार्यक्रमात टिळा न देता बहिष्कृत केले. त्यामुळे आम्हाला सर्वांसमोर अपमानित होऊन तिथून जावे लागले. तसेच जानगवळी, हिरणावळे, औरंगे यांनी फियार्दीस अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन त्यांना अपमानीत करुन त्यांची बदनामी केली. त्यांच्यामुळे फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाच्या जीवीतास धोका असल्याचे त्यांनी फिर्यादी मध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे सामाजिक बहिष्कृत कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
गवळी समाजाच्या एका व्यक्तीला साखरपुड्याच्या कार्यक्रमात बहिष्कृत करून अपमानित करण्यात आले. या समारंभाला ते उपस्थित राहातील तर कार्यक्रम होऊ देणार नाही अशी धमकीही देण्यात आली. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये ते पंचांविरूद्ध तक्रार करण्यास गेले असता त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यांना वारंवार केस दाखल करत आहेत असेच सांगितले जात होते. परंतु अंनिसच्या पाठपुराव्यामुळे पंचाविरूद्ध सामाजिक बहिष्कार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी सांगितले.