जुन्नर तालुका तलाठी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला सुधाकर रंगनाथ वावरे व सहकारी रजाक इनामदार यांनी पोलीस पथकाचा संशय आल्याने त्यांनी लाचेची ५० हजारांची रक्कम स्वीकारली नाही. परंतु लाचेची मागणीचे ध्वनिमुद्रण रेकॉर्डिंग झाले असल्याने त्याचे आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वावरे व इनामदार यांना अटकेनंतर राजगुरूनगर येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कठडी सुनावण्यात आली आहे. मात्र तलाठ्यावर कारवाई झाल्याचे या घटनेवरून जुन्नर महसूल कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे.
पुणे लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील बिले यांच्या पथकाने ही कारवाई केली. जुन्नर शहरातील बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यावसायिक शोएब जैनुद्दीन शेख यांनी यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तक्रारदार व पंच यांना जुन्नर येथील तलाठी कार्यालयात पाठविले. या वेळी तलाठी कार्यालय बंद असल्याने जुन्नर बसस्थानक येथे आरोपी व तक्रारदार यांचे भेटीत ५० हजार रु. लाचेची मागणी करण्यात आली. ही लाचेची रक्कम रजाक इनामदार याचेमार्फत सोमतवाडी येथील कोविड सेंटरसमोर देण्याचे ठरले. त्याप्रमाणे लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार व पंच व त्यांचे मागे पोलीस पथक सोमतवाडी येथे गेले. रजाक इनामदार यांना पोलीस पथकाचा संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारले नाही. शेख यांनी या वेळी तलाठी वावरे यांना संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.
या वेळी इनामदार याला अटक करण्यात आली. परंतु तक्रारदार व आरोपी लाचेची मागणीचे ध्वनिमुद्रण रेकॉर्डिंग झाले असल्याने त्याचे आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. नंतर रात्री उशिरा तलाठी वावरे याला अटक करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.