पुणे : दैनंदिन प्रवासादरम्यान प्रवाशांना होणाऱ्या समस्या जाणून व समजून घेण्यासाठी पीएमपीएमएलचे नवनियुक्त अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी सोमवारी (दि. १०) रोजी एक सामान्य नागरिकाप्रमाणे बसमधून प्रवास केला.
यादरम्यान त्यांनी सहप्रवाशांशी संवाद साधून समस्यांवर चर्चा केली आणि बससेवेच्या विकासाबाबत त्यांच्या सूचना घेतल्या. नागरिकांशी अधिक संवाद साधण्यासाठी, पीएमपीएमएल तत्काळ प्रभावाने “प्रवासी दिन” हा नवीन उपक्रम सुरू केला.
सामान्यांप्रमाणे केला प्रवास-
५० रुपयांचा पास काढून सामान्य साडेदहाच्या सुमारास मनपा ते आळंदी प्रवाशांप्रमाणे बसमधून प्रवास केला. बसमध्ये शिवाजीनगर येथून बसले. 'पीएमपी'च्या या प्रवासात त्यांना शिवाजीनगरमध्ये बसमध्ये चढल्यानंतर अनुभव आले.
आता नागरिकांनाही करता येणार सूचना-
बससेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी, प्रवाशी सेवा लोकाभिमुख होण्यासाठी व प्रवाशांचे मोलाचे मार्गदर्शन मिळवण्याकरीता प्रत्येक आगारामध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी दुपारी ०३:०० ते ०५:०० या वेळेत "प्रवासी दिन" आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच ज्या प्रवाशांना त्यांच्या दैनंदिन कामामुळे किंवा वेळेअभावी आगारात येऊन तक्रार किंवा सूचना करण्यास येता येत नसेल त्या प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या मुख्य बस स्थानकांवर व पास केंद्रांवर अर्ज द्यावेत. तरी पीएमपीएमएलमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या प्रवासी दिन या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.