इंदापूर : गर्भवती महिलांच्या गर्भाची चार चाकी गाडीमध्ये बेकायदेशिरपणे तपासणी करून लिंगपरिक्षण करणार्या दोन डाॅक्टर,एक लॅब टेक्निशियन,एक महिला व गाडी चालकासह पाच जणांच्या टोळीवर कारवाई करण्यात इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक यांचे पथकाला पोलीसांच्या मदतीने यश आले आहे. याबाबत इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय वैद्यकीय अधिक्षक डाॅ.संतोष मारूतीराव खामकर यांनी आरोपीं विरूद्ध पीसीपीएनडीटी कायद्यानुसार इंदापूर न्यायालयात फिर्याद दीली असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली.
प्रविण पोपटराव देशमुख (वय३२)लॅब टेक्निशियन, तौशिफ अहमद शेख (वय ३०), गाडीचालक ड्रायव्हर, दोघे रा.राजाळे, ता. फलटण, जि. सातारा, डाॅ. सुशांत हणुमंत मोरे (डाॅक्टर), डाॅ. हणुमंत ज्ञानेश्वर मोरे (डाॅक्टर), व श्रीमती कमल हणुमंत मोरे (गृहीणी) सर्वजण (रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी बेकायदेशिरपणे गर्भलिंगनिदान करणार्या टोळीतील आरोपींची नावे असून संबधित आरोपी विरोधात इंदापूर न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बलेनो कार नंं.एम.एच.११,सी.जी.८०१६ या गाडीमध्ये काही लोक गावोगावी फिरून महिलांचे गर्भाची बेकायदेशिरपणे तपासणी करून लिंगपरिक्षण करत असल्याची माहिती गुप्त खबर्या फिर्यादी वैद्यकीय पथकाला मिळाली होती. त्या अणुषंगाने फिर्यादी यांनी इंदापूर सहाय्यक पोलीस निरिक्षक नागनाथ पाटील यांचे पथकाच्या मदतीने संशयित बलेनो कारचा शोध घेतला असता सदरची गाडी ही मौजे सुरवड येथील भांडगाव रोडजवळ थाबलेली आढळून आली. सदर गाडीवर फिर्यादी व पोलीस पथकाने छापा टाकला असता गाडीत दोन इसम गर्भवती महिलेचा गर्भ तपासणी करताना आढळून आले.
फिर्यादी व पोलीस पथकाने बलेनो गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये लिंगपरिक्षण मशिन, दोन मोबाईल व इतर वैद्यकीय साहित्य मिळून आले. सदरचे साहित्य पंचा समक्ष जप्त करून गाडीतील दोन इसमांकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन साथीदारांची नावे सांगितली.