वानवडी : वानवडीतील शिवरकर रस्त्यावरील परमारनगर ते एबीसी फार्म साळुंखे विहारपर्यंत असणाऱ्या दुकानांसमोरील तसेच सोसायटीच्या मोकळ्या जागेवर अनाधिकृतपणे उभारलेल्या अतिक्रमाणावर महानगरपालिका बांधकाम व वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय अतिक्रमण विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.
कारवाई दरम्यान रस्त्यावरील दुकानांसमोर व बाजूच्या मोकळ्या जागेवर अनाधिकृत पणे ठेवण्यात आलेल्या वस्तू तसेच उभारण्यात आलेले शेड जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी ४५०० स्क्वे.फुट. शेड व कच्चे-पक्क्या बांधकामावर कारवाई करण्यात आली. तसेच लोखंडी/स्टील चे ६ कांऊटर, १० बोर्ड, कपाट, २० मोकळे कँरेट, २ हातगाड्या, सिलेंडर -शेगडी, छत्र्या जप्त करण्यात आल्या.
अतिक्रमण कारवाईला सुरुवात झाल्याचे समजताच शिवरकर रस्त्यावरील पुढील व्यावसायिक सावध झाले. त्यामुळे ज्यांना शक्य झाले अशांनी त्वरीत दुकानांसमोर अनाधिकृत पणे ठेवलेल्या वस्तु दुकानात घेत दुकाने बंदच ठेवली तर लहान लहान हाँटेल मालकांनी लावलेले ताडपत्रीचे शेड काढून घेतले. या सर्व प्रकारामुळे सरकारी अधिकाऱ्यांसमोर व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते.
पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभाग तसेच वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहा. आयुक्त शाम तारु यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम निरिक्षक श्रमिक शेवते, क्षेत्रीय अतिक्रमण निरिक्षक शाम अवघडे, कनिष्ठ अभियंता मोडवे, अतिक्रमण निरिक्षक संजय जाधव, गणेश तारु, सहा. अतिक्रमण निरिक्षक निमगिरे, टिळेकर, जगदाळे, सपकाळ व इतर कर्मचारी वर्ग यांच्याकडून हि कारवाई झाली.
अनधिकृतपणे उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड, दुकानसमोरील तसेच आजुबाजूच्या मोकळ्या जागेवर केलेल्या अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात येत आहे. अशी कारवाई पुणे शहरात सर्वत्र सुरू आहे.
-श्रमिक शेवते, बांधकाम निरिक्षक, पुणे मनपा.