यवत : डाळिंब (ता. दौंड) येथील ओढ्यातून रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूउपसा सुरू असताना दौंड महसूल विभागाने छापा टाकत १ जेसीबी मशीन, २ ट्रॅक्टर आणि १ ट्रक पकडला असल्याची माहिती यवतचे मंडल अधिकारी डी. सी. शेळकंदे यांनी दिली. अचानक छापा पाडल्याने वाळूमाफियांची धावपळ उडाली. यातच संबंधित वाळूचोर उपसा करणारी वाहने तेथेच सोडून फरार झाले. डाळींब येथे बऱ्याच दिवसांपासून ओढ्यातील वाळू बेकायदेशीरपणे उपसत असल्याची माहिती दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी संजय असवले यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आदेश दौंडचे तहसीलदार विवेक साळुंके यांना दिले. यानुसार तहसीलदार यांनी यवत महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मंगळवारी (दि. १५) रात्री १० वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. या वेळी छाप्यात दोन ट्रॅक्टर, एक जेसीबी यंत्र व एक मालट्रक ताब्यात घेण्यात आले. अंधाराचा फायदा घेऊन संबंधित वाळूचोर या वेळी पळून गेले. सर्व वाहने जप्त केली. संबंधित वाहनमालकांचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे शेळकंदे म्हणाले. (वार्ताहर)
डाळिंबला वाळूमाफियांवर कारवाई
By admin | Published: November 18, 2016 6:03 AM