पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी विविध विषयांचे प्रश्नसंच काढण्याची जबाबदारी विद्यापीठाने सुमारे २८ हजार प्राध्यापकांकडे दिली आहे. मात्र, त्यातील सुमारे ७ ते ८ हजार प्राध्यापक प्रश्नसंच देण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यापीठाने संबंधित प्राध्यापकांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांतील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. त्यासाठी विविध विषयांचे प्रश्नसंच तयार करण्याचे काम परीक्षा विभागातर्फे काही प्राध्यापकांना दिले. तसेच प्राध्यापकांना प्रश्नसंच तयार करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी महाविद्यालयांनी संबंधित प्राध्यापकांना महाविद्यालयीन कामातून सुट द्यावी, अशा सूचनाही परीक्षा विभागाने संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिल्या. तरीही काही प्राध्यापक वेळेत प्रश्नसंच देण्याकडे दुर्लक्ष करून आपली जबाबदारी टाळत आहेत.
प्रश्नसंच निर्मितीचे केवळ ६० ते ७० टक्के पूर्ण
प्राध्यापकांना एका प्रश्नासाठी प्रत्येकी १२ रुपये देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. एका प्राध्यापकाला १ हजार रुपये रकमेपेक्षा अधिक प्रश्न काढता येणार नाही, अशीही मर्यादा विद्यापीठाने घालून दिली आहे. प्राध्यापकांच्या मानधनात विद्यापीठाने वाढ केली. तरीही अद्याप प्रश्नसंच निर्मितीचे केवळ ६० ते ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे जबाबदारी देऊनही कामात टाळाटाळ करणाऱ्या प्राध्यापकांवर विद्यापीठ कायद्यातील नियमावलीप्रमाणे कारवाई करण्याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.