पुणे : परप्रांतीय मंजुराना भीती दाखवून त्यांच्या जवळील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतल्या प्रकरणात ११ लोहमार्ग पोलिसांवर कारवाई केली. पुणे स्थानकावरून त्यांची बदली मुख्यालयात केली. लोहमार्गचे पोलीस अधीक्षक यांनी ही कारवाई केली आहे.
गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूर आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी करीत आहेत. अशा पैकी काही मजुरांना फलाट तीनच्या पादचारी पुलाच्या जिन्याखालील मोकळ्या जागेत नेऊन त्यांना कारवाईची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याच्या घटनेत वाढ होत होती. मंगळवारी नगरसेवक तथा मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी याची दखल घेऊन पुणे स्थानकावर आपल्या कार्यकर्ता समवेत दाखल झाले होते. त्यांनी याचे चित्रणदेखील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सादर केले. त्याची दखल घेऊन बुधवारी ही कारवाई केली.
कोट
गरीब प्रवाशांकडून पोलिसांनी पैसे काढून घेणे हा खूप गंभीर प्रकार आहे. त्यांची केवळ बदली करून चालणार त्यांच्यावर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे.
- निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे
कोट
परप्रांतीय मजुरांना लोहमार्ग पोलीस त्रास देत असल्याची तक्रारी मिळाल्या होत्या. त्यामुळे मी स्वतः दोन दिवस वेषांतर करून पुणे स्थानकावर फिरत होतो. पोलीसवर झालेल्या कारवाईचे मी स्वागत करतो.
- वसंत मोरे, नगरसेवक