लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यास किंवा रात्रीच्या वेळेस प्रवासी घेण्यास नकार देणाऱ्या अथवा ज्यादा भाड्याची मागणी करणाऱ्या काही मुजोर रिक्षाचालकांमुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, अशा प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला असून, तब्बल २२७ रिक्षाचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला सूचित करण्यात आले आहे. रिक्षाला हात केल्यानंतर चालकाकडून कुठे जाणार? अशी विचारणा होते. पण अमुक एक ठिकाण सांगितल्यावर रिक्षाचालकांकडून हमखास नकार ऐकायला मिळतो. रात्रीच्या वेळेस बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात हा अनुभव प्रत्येक प्रवाशाला येतोच. मात्र रिक्षाचालकांचा हा मुजोरपणा सहन करण्याशिवाय प्रवाशांसमोर पर्याय नसतो. यासंदर्भात काही प्रवाशांनी वाहतूक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर पालखीचे पुण्यात आगमन होण्यापूर्वी दहा दिवस शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांवर कारवाईची मोहीम राबविली. साध्या वेशातील कर्मचाऱ्यांनीच डमी प्रवासी म्हणून रिक्षाचालकांकडे विचारणा केली. प्रवासी भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना पोलीस चौकीमध्ये आणण्यात आले.
रिक्षाचालकांवर कारवाई
By admin | Published: June 28, 2017 4:22 AM