बारामती : विद्यार्थिनींना होत असलेल्या छेडछाडीच्या प्रकाराची ‘स्टिंग आॅपरेशनद्वारे’ सत्य उघड केल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात आजपासून रोडरोमिओंवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. सलग १५ दिवस पोलीस महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंवर कारवाई करणार आहेत. मुली व महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण होईल याची काळजी घ्या, असे आदेश देण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शहरातील शाळा, कॉलेज परिसरात जोरदार मोहीम सलग दुसऱ्या दिवशी राबविली. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी स्वत: लक्ष देऊन शहरातील शाळा, महाविद्यालय परिसर पिंजून काढला. बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय शैक्षणिक संकुल परिसर, विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल परिसरासह शहरातील हायस्कूलच्या परिसरात पोलिसांनी मोहीम राबविली. शहर पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक छबू बेरड, दामिनी पथकाच्या आशा शिरतोडे, सुप्रिया बनसोडे, आशाराणी जाधव, गुन्हेशोध पथकाचे रमेश केकाण आणि इतरांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. या संदर्भात पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी सांगितले की, पालकांच्या समोर समज दिल्यास तरुणांमध्ये फरक पडतो. तसेच, आपला मुलगा काय करतो आहे, याची माहिती पालकांना मिळते. यासाठी पालकांना बोलावून घेण्यात आले होते. (प्रतिनिधी) केली कठोर कारवाईआज महाविद्यालयात प्रवेश नसलेल्या १२ तरुणांवर कारवाई करण्यात आली. त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्या पालकांना पाचारण करण्यात आले.पालकांसमोर समज दिली. त्यांना कलम ११०/११२ प्रमाणे नोटिसा देण्यात आल्या. कॉलेज परिसरात पुन्हा हे तरुण छेडछाड करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.
रोडरोमिओंवर जिल्ह्यात कारवाई सुरू
By admin | Published: July 29, 2016 3:45 AM