पुणे : हेल्मेटसक्तीच्या पोलिसांच्या निर्णयावर वाद सुरू असतानाच आता प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) कारवाईचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. दंडात्मक कारवाईसह परवानाही निलंबित केला जाईल. इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेतले जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.पोलिसांनी १ जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी गट सक्रीय झाले असून त्याला कडाडून विरोध केला जात आहे. आता ‘आरटीओ’नेही हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल नुकताच सादर केला आहे. याअनुषंगाने या समितीने दिलेल्या सुचनांनुसार केलेल्या कारवाईचा आढावा गुरूवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, वाहतुक पोलिस उपायुक्त, आरटीओ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोटार वाहन कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्याचे आदेश सचिवांनी दिले आहेत. हेल्मेटसह वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाºयांची तपासणी मोहिम राबवून दोषी चालकांविरूध्द कडक कारवाई करण्याचे तसेच वाहन अटकावून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. आजरी म्हणाले, पोलिसांनी दि.१जानेवारीपासून हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार हेल्मेटसह सर्वच वाहतुक नियमांबाबत सोमवारपासून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासूनच वाहतुक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली जाईल. हेल्मेटबाबतचे नियम वाहन चालविणारी व्यक्ती तसेच मागे बसलेल्या व्यक्तीसाठी संपुर्ण राज्यभर लागू असतील.याआधी केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. यापुढे हेल्मेट नसल्यास ५०० रुपयांचा दंड आकारून परवाना निलंबित करण्यात येईल. वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा परवानाही निलंबित करण्यात येणार असल्याचे आजरी यांनी सांगितले.--------------- समुपदेशनानंतरच मिळणार परवाना हेल्मेट व सीट बेल्ट विषयक नियमांचा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला सुरूवातील दंड आकारून परवाना निलंबित केला जाईल. त्यानंतर तडजोड शुल्क वसुल करण्यापुर्वी संबंधित नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीस कमीतकमी दोन तास कालावधीच्या रस्ता सुरक्षा विषयक नियमांच्या समुपदेशासाठी उपस्थित राहावे लागेल. या समुपेदशनाला उपस्थित असल्याचा पुरावा दाखविल्यानंतरच परवाना परत दिला जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी स्पष्ट केले.
हेल्मेटसक्तीसाठी आरटीओचीही कारवाई, सोमवारपासून परवाना निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 12:23 PM
येत्या सोमवारपासून हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई सुरू केली जाणार आहे.
ठळक मुद्देवाहतूक पोलीसांची घेणार मदत : दोन तास सक्तीचे समुपदेशनहेल्मेट व सीट बेल्ट विषयक नियमांचा भंग केल्यास संबंधित वाहनचालकाला परवाना निलंबितहेल्मेटबाबतचे नियम संपुर्ण राज्यभर लागू शहरातील हेल्मेटसक्ती विरोधी गट सक्रीय झाले असून त्याला कडाडून विरोध रस्ते सुरक्षा समितीपुढे रस्ते अपघात नियंत्रणासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा वार्षिक अहवाल सादर