देऊळगाव राजे : दौंड तालुक्यात वाळूमाफियांवर महसूल प्रशासनाची कारवाई सुरूच असून खोरवडी-आलेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीच्या पात्रात दोन बोटी जाळल्या तर एक बोट जिलेटिनने उडविण्यात आली. तहसीलदार उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, वनविभाग आणि पोलीस यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. या परिसरात बेकायदेशीर वाळूउपसा सुरूअसल्याची माहिती महसूल खात्याला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी दुपारी अचानक छापा टाकून बोटी जाळण्याची कारवाई करण्यात आली. तसेच एक बोट वाळूमाफियांना पळवून नेण्यात यश मिळाले. मात्र या बोटीचा पाठलाग करून ही बोट पुढे पकडली आणि जिलेटिनने उडवली. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, शिरापूर येथील वनखात्याच्या जमिनीतून वाळूतस्करी केली जाते. मात्र या ठिकाणी शासनाचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या वाळूउपशाविरोधाच्या कारवाईबाबत ग्रामस्थांत समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)