पुणे : महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत न केल्यामुळे जलसंपत्ती नियामन प्राधिकरण विभागाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी बारामतीमधील शेतकऱ्याने जलसंपदा विभागाकडे केली आहे. अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. बारामती तालुक्यातील उंडवडी गावचे माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी ही तक्रार जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. खडकवासला पाटबंधारे विभागाला महानगरपालिकेने पाणी नियंत्रण यंत्रणा हस्तांतरीत केलेली नाही. मुठा कालवे यांनीही महापालिकेला पाणी नियंत्रण करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभागाने देखील पाणीवापर नियंत्रित करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्यास महापालिकेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्याचे लेखी उत्तर खडकवासला पाटबंधारे विभागाने तक्रारदार जराड यांना दिले आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाने महापालिकेस ११.५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी कोटा मंजूर केला आहे. त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. पुर्वी खरीप, रब्बी आणि उन्हाळी आवर्तन दिली जात होती. यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे जराड यांनी जलसंपदा विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
शेतीला पाणी न देणाऱ्यां अधिकाऱ्यांवर कारवाई करावी : जलसंपदाकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 8:22 PM
यंदा धरणात शंभरटक्के पाणीसाठा असूनही, नियोजना अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नाही
ठळक मुद्दे जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशची अंमलबजावणी व्हावी