पाषाण : सुसगाव येथे ब्रिटिशकालीन बंकर असलेल्या टेकडीचे अनधिकृत उत्खनन सुरू आहे. अनधिकृत खोदकामांच्या तक्रारी करूनसुद्धा त्यावर अद्याप कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे . सुसगाव परिसरांमध्ये अवैध रीतीने डोंगरफोड सातत्याने सुरू असते, परंतु याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसते. अनधिकृत डोंगरफोडीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, पर्यावरणाचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
एकीकडे बाणेर सुसगाव परिसरामध्ये पर्यावरणप्रेमी नागरिक डोंगरांवर वृक्षसंवर्धनाचे काम करीत असताना अशा पद्धतीने ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या टेकडीची अवैध रीतीने होत असलेली डोंगरफोड याकडे दुर्लक्ष होत आहे, शिरगाव परिसरातील अवैध उत्खननाच्या विरोधात वारंवार तक्रारी करूनसुद्धा कारवाई होत नसल्याने अवैध रेतीचे उत्खनन करणारे व शासनाचे अधिकारी यांच्यात काही साटेलोटे आहे का, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. सुसगाव परिसरातील अवैध डोंगर फोडीविरोधात कारवाई करावी, तसेच येथील पर्यावरणा ऱ्हास थांबवावा व कारवाईची मागणी केली आहे.