पुणे : सिगारेट्स आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक (कोटपा) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची सामूहिक शपथ घेत पुणे शहर पोलिसांनी शाळा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी कोटपा कायद्याचे खास प्रशिक्षण पुणे पोलिसांना देण्यात आले.सिगारेट्स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा (कोटपा) - २००३च्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण कार्यशाळा झाली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. अंकित शहा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण प्रकल्पाचे नोडल अधिकारी डॉ. सुहासिनी घाणेकर, संबंधचे महाराष्ट्र प्रकल्प प्रमुख दीपक छिब्बा, व्यवस्थापक देविदास शिंदे यांनी मार्गदर्शन केले.डॉ. वेंकटेशम म्हणाले, कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाºयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही सार्वजनिक स्थळी धूम्रपान करणे गुन्हा आहे. लहान मुले आणि तरुणांना अशा उत्पादनाच्या संपर्कात आणणे अधिक धोकादायक आहे. या कार्यशाळेतील प्रशिक्षणामुळे शाळा-कॉलेज परिसरात तंबाखू-सिगारेटची विक्री रोखण्यास मदत होईल.सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी ५० टक्के कॅन्सर आणि ९० टक्के तोंडाचे कॅन्सर हे केवळ तंबाखू सेवनामुळे होतात. जे रुग्ण अशा जीवघेण्या आजाराच्या शस्त्रक्रियेतून जातात ते आयुष्यात निराश होऊन जीवनाचा आनंद हरवून बसतात. त्यापैकी ५० टक्के रुग्ण एक वर्षापेक्षा जास्त जगत नाहीत, असे डॉ. अंकित शहा यांनी सांगितले.महाराष्ट्रात जवळपास २.४ कोटी लोक तंबाखू उत्पादनाचा वापर करतात. आणि तंबाखूमुळे होणाºया आजारात दरवर्षी ७२ हजार लोक मरण पावतात. श्वसनरोग, क्षयरोग आणि अन्य आजरापेक्षा ही सार्वजनिक स्थळी धूम्रपान करून इतरांच्या आरोग्य धोक्यात टाकतात. महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी ५३० मुले तंबाखूच्या संपर्कात येतात.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 3:59 AM