लोणी काळभोर : येथील पोलीस ठाण्याच्या वतीने विनापरवाना अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मद्यविक्री करणारे व जुगार अड्डे यांवर धाड घालून आजअखेर २ लाख ५० हजार २८ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला असून, यामध्ये १२१ जणांना जेरबंद करण्यात आले आहे.लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत विनापरवाना अवैध धंदे वाढीस लागल्याच्या तक्रारीत वाढ झाल्याने या धंद्यांविरोधांत विशेष मोहीम हाती घेण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार व सहायक पोलीस निरीक्षक रणजितसिंह परदेशी यांचे नेतृत्वाखाली हे धंदे समूळ नष्ट करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत २०१६ मध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ६१ दारूधंद्यांवर कारवाई केली असून, यांमध्ये ५९ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ११ हजार १५९ रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. २९ मटका व जुगारअड्ड्यांवर छापा घालून तेथील ६२ जणांना जेरबंद करण्यात आली असून, या ठिकाणावरून ३८ हजार ८६९ रुपयांना माल ताब्यात घेण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीत अवैध धंदा चालू असल्याचा दिसल्यास अथवा त्याबाबत माहिती मिळाल्यास द्यावी. एखाद्या वैयक्तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम अथवा लग्नसमारंभात डिजे लावून ध्वनिप्रदूषण होत असल्याचे आढळून आल्यास त्यांनीही संपर्क साधण्याचे आवाहन बंडोपंत कौंडुभरी यांनी केले आहे़ (वार्ताहर)
अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम
By admin | Published: June 12, 2016 5:57 AM