मंचर : डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सदरचे आवर्तन असून टेल टू हेड या पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेतीसाठी पंपाद्वारे कालव्यातून पाणी उचलू नये अन्यथा कारवाईचा इशारा जलसंपदा विभाग अधिकाऱ्यांनी दिला़ प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आंबेगाव व शिरूर तालुक्यांतील टंचाई निवारणार्थ डिंभे धरणाच्या कालव्याला बुधवारी सकाळी पाणी सोडण्यात आले आहे. पिण्याचे पाण्यासाठी सदरचे आवर्तन असून टेल टू हेड या पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शेती पिकांसाठी कालव्यावर वीजपंप, डिझेल पंप, अथवा अन्य मार्गाने कुणीही पाणी उचलू नये असे आवाहन जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.अशा प्रकारे कुणी पाणी उचलल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या पाण्यामुळे आंबेगाव तालुक्यातील शिनोली ते लोणीपर्यंतच्या ३७ गावांना तर शिरूर तालुक्यातील संविदणे ते निमगाव भोगीपर्यंतच्या १२ गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. सदरचे आवर्तन पार पाडण्यासाठी जलसंपदा, महसूल, पोलीस, वीज वितरण व पाणीपुरवठा विभाग संयुक्तरीत्या कार्यरत असणार आहे.
डिंभे कालव्यातून पाणी उचलल्यास कारवाईचा इशारा
By admin | Published: April 15, 2016 3:29 AM