नारायणगाव : नारायणगाव-वारुळवाडी गटात निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांवर हद्दनिश्चिती, पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका आणि मतदानाच्या दिवशी वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक मार्गात बदल केले आहेत. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे अशी माहिती नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली आहे . नारायणगाव वारुळवाडी गटात एकूण ६४ बूथवर २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी व शांततेत मतदान होण्यासाठी गावातील प्रमुख पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, नागरिक यांची पोलीस ठाण्यातील सभागृहात नुकतीच बैठक घेण्यात आली. या वेळी नारायणगाव पोलीस ठाण्यांतर्गत सावरगाव-धालेवाडीत हवेली या जि.प. मतदारसंघातील काही गावे तसेच आळे-पिंपळवंडी मतदारसंघातील व राजुरी-बेल्हे या मतदारसंघातील २१ गावे नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने या सर्व ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक, टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस उपनिरीक्षक, १५० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. मतदारप्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्व गावांतील सरपंच, सदस्य, सर्व पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच १९ तारखेला रात्री १० वा.पर्यंत सर्व प्रचार साहित्य, बोर्ड पक्षांनी काढून टाकावेत, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात मतदारांना ने-आण करणे, प्रलोभन दाखविणे असे प्रकार आढळल्यास कोणाची हयगय केली जाणार नाही. नारायणगाव परिसरातील गंभीर गुन्हे असलेल्या ५ जणांवर निवडणूक कालावधीत मतदानापासून अबाधित ठेवून तडीपारीची कारवाई व १०० जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. (वार्ताहर)नारायणगाव जुन्नर रोडवरील चारचाकी व अवजड वाहनांसाठी वाहतूक मंगळवारी (दि. २१) बंद केली असून पुणे नाशिक महामार्गावरून पूनम हॉटेल कोल्हे मळा मार्गे वापर करावा असा बदल केला आहे.
नारायणगावला पाच जणांवर तडीपारीची कारवाई
By admin | Published: February 21, 2017 1:45 AM