पुणे : बोपोडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडास पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचा आदेश दिला आहे. अजय ऊर्फ कावू शिवकुमार पिल्ले (वय २८, रा. नाईक चाळ, बोपोडी) असे या गुंडाचे नाव आहे.
अजय पिल्ले हा साथीदारांसह खडकी, बोपोडी परिसरात लोखंडी कोयता, तलवार, चाकूसारख्या घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहे. मागील ५ वर्षांमध्ये ३ गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक उघड तक्रार करायला तयार नाहीत.
खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पीसीबीचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन अजय पिल्ले याला एक वर्षाकरीता अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी या वर्षभरात एम पी डी ए कायद्यान्वये ७१ गुंडावर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.