पुणे : खंडणी न दिल्याने महसूल, महापालिकेकडून गुंडांनी बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करविली. कोंढव्यात आमचेच राज्य चालते, असे धमकावून गुंड पिता पुत्राने ५१ लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आसीफ कदीर शेख (वय ३५, रा. कोंढवा) यांनी कोंढवापोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शफी पठाण व समीर पठाण (रा. पारगेनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसाय आहे. ते पोकळे मळा येथे काम सुरू केले असताना तेथे शफी पठाण आले. २५ लाख रुपये व बांधकाम प्रकल्पामध्ये एक दुकान दे, तुला सरकारी परवानगी मिळवण्यासाठी मदत करताे, असे सांगितले. त्याला नकार दिल्यावर महसूल पठाण यांनी विभागाकडे तक्रार केली. अवैध गौण खनिज उत्खननाचा २३ लाख रुपये दंड बजावला गेला. त्यांची चौकशी केल्यावर समीर पठाण याने तक्रार केल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी नाइलाजास्तव १० लाख रुपये दिले. त्यांनी बांधकाम सुरू केल्यानंतर बांधकामाच्या परवानगीसाठी शफी पठाण याने पुणे महापालिकेत ओळखीने काम करून देतो, असे सांगून पुन्हा पैशांची मागणी केली. त्यांनी न दिल्याने त्याने कोंढवा पोलिस ठाण्यात तसेच महापालिकेकडे तक्रार केली.
त्या तक्रारीवरून महापालिकेने बांधकामावर कारवाई केली. त्यांच्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांचा फ्लॅटचा ताबा देण्यासाठी दबाव येत होता. तक्रार मागे घेण्यासाठी शफी पठाण याने ४० लाख मागितले. अशा प्रकारे ५१ लाख ५० हजार रुपये घेऊनही काम केले नाही. आणखी साडेतीन लाखांची मागणी केली. काम होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. शेवटी फिर्यादी पोलिसांकडे धाव घेतली असून, सहायक पोलिस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.
रमजान स्टॉलसाठी मंडप टाकल्याने खंडणी
एकाने रमजान महिन्यात हॉटेलचा स्टॉल टाकण्यासाठी मंडप टाकला होता. आमच्या परवानगीशिवाय मंडप कसा टाकला, असे म्हणून व्यावसायिकाकडून समीर पठाण याने ३ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला आहे.