पुणे : शहरातील महापालिकेच्या पार्किंगची व्यवस्था पाहणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध पहिली तक्रार आल्यास त्याच्या मासिक रकमेच्या २५ टक्के, दुसऱ्या तक्रारीला ५० टक्के, तिसऱ्या ७५ टक्के दंडात्मक रक्कम वसूल केली जाणार आहे. चौथ्या तक्रारीनंतर पार्किंगचा ठेकाच रद्द करण्याची कारवाई महापालिका प्रशासनाकडून केली जाणार असल्याचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. पार्किंगबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.शहरामध्ये रेल्वेस्थानक, बसस्थानक, विविध सभागृहे, बगीचे या ठिकाणी महापालिकेची वाहनतळे आहेत. या वाहनतळाचे व्यवस्थापन पाहण्याची जबाबदारी टेंडर प्रक्रिया राबवून ठेकेदारांना देण्यात आली आहे. पार्किंगसाठी माफक दर ठरवून देण्यात आले आहेत. मात्र ठेकेदारांकडून या दरापेक्षा वाहनचालकांकडून जास्त पैसे घेतले जात असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत.पार्किंगसंदर्भातील तक्रारी वाढत असतानादेखील प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र दिसत होते. मात्र, आता या हेल्पलाईनमुळे तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर कारवाई होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. तक्रारीवर किरकोळ कारवाई होत असल्याने ठेकेदार पालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. यापार्श्वभूमीवर पार्किंगमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ठोस असे धोरण जाहीर केले आहे.
पार्र्किं गसाठी जास्तीचे पैसे घेतल्यास कारवाई
By admin | Published: April 09, 2016 1:57 AM