जेजुरी : जेजुरी सासवड, मोरगाव, नीरा राज्यमार्गावर बेशिस्तपणे व सुरक्षित वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्या २२५ दुचाकी, चारचाकी वाहनांवर जेजुरी पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसात सुमारे ४७ हजारांहून अधिक रक्कमेचा दंड वसूल केला आहे. पुढील काळातही अशाच स्वरूपाची कारवाई सुरू राहणार असून रस्त्यांवर होणाऱ्या वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हे पाऊल उचलले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी दिली.जेजुरी येथील मुख्य शिवाजी चौक व मोरगाव मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नेहमीच वाहतूककोंडी होत असते. त्यातच दुचाकी व चारचाकी वाहनचालक बेशिस्तपणे विरुद्ध मार्गाने वाहने पुढे काढत असल्याने वाहतूककोंडीत भरच पडते. त्याअनुषंगाने जेजुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस हवालदार बी. एस. पानसरे, कुलदीप फलफले, रणजित निगडे, एच. बी. नलावडे, नितीन कदम, रमेश नवले आदी कर्मचाऱ्यांनी मोरगाव रस्ता, नीरा मार्ग व सासवड रस्त्यावर पथक तयार करून वाहन तपासणीला सुरुवात केली. जेजुरी शहरातील मुख्य राज्यमार्गांवर बहुतेक वेळा अल्पवयीन मुले दुचाकी, चारचाकी अथवा ट्रॅक्टरसारखे वाहन चालविताना आढळून येतात, ही बाब गंभीर असून पालकांनी अल्पवयीन मुलांना राज्यमार्गावर वाहन चालविण्यास देऊ नये. तसे आढळून आल्यास पुढील काळात वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, जेजुरी पोलिसांचे अवैध प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध घालण्याचेही धोरण आहे. तसेच सध्या बुलेट गाडीची क्रेझ असून या वाहनाच्या सायलेन्सरला फटाक्यासारखा आवाज जोडलेला निदर्शनास येतो. ब्रेक मारल्यानंतर अथवा विशिष्ट बटण दाबल्यानंतर फटाक्यांसारखा जोराचा आवाज येतो त्यातून इतर वाहनचालक बिचकतात व अपघात होण्याचा संभव असल्याने अशी वाहने निदर्शनाला आल्यास कडक दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सध्या दुचाकी, चारचाकी वाहनांना फॅन्सी नंबरप्लेट लावलेली पाहावयास मिळतात, अशा नंबर प्लेट बेकायदेशीर असून त्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
जेजुरीत वाहनचालकांवर केली कारवाई
By admin | Published: April 27, 2017 4:49 AM