वाल्हे : सुकलवाडी येथे मंगळवारी (दि. २५) भंडाऱ्यानिमित्त वाडीच्या वतीने आयोजित केलेल्या तमाशाच्या कार्यक्रमात दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर दुसऱ्या दिवशी हाणामारीत झाल्याने दोन्ही गटांच्या वतीने वाल्हे पोलीस आउट पोस्टमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हे येथील सुकलवाडी येथे मंगळवारी तेथील भंडाऱ्यानिमित्त तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बसण्याच्या व हातवारे करण्याच्या कारणावरून वाडीतील दोन गटांमध्ये गोंधळ झाला. गोंधळाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने ऐन कार्यक्रमातच अंधारामध्ये मोठी पळापळ होऊन हाणामारी सुरू झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याने तणाव वाढला.सुकलवाडी येथील अमित अरुण पवार (वय २१) याने वाल्हे पोलीस आउट पोस्टमध्ये फिर्याद दिली. या वेळी गावकऱ्यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अमित पवार याने पुन्हा येऊन वाद घातल्याने वाडीतील ग्रामस्थांनी संध्याकाळी मीटिंग घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याचे ठरले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी अमित पवार याने पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच हाणामारी केल्याने संतप्त झालेल्या वाडीकरांनी त्याच्या विरोधात वाल्हे पोलीस दूरक्षेत्रामध्ये तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर संतापलेल्या सुकलवाडीकरांनी पोलीस दुरक्षेत्रासमोर गर्दी केली होती. दरम्यान, या वेळी घटनेचे गांभीर्य पाहून हवालदार श्रीरंग निगडे यांनी जेजुरीहून अतिरिक्त बंदोबस्त मागविला. त्यानंतर सर्वांनाच जेजुरी येथे पाठविण्यात आले. जेजुरी पोलीस ठाण्यात अमित पवार याने अविनाश दाते, अरुणा दाते, सरोज दाते, पांडू दाते, केशव पवार, अंकुश चव्हाण, शरद चव्हाण, अक्षय पवार, संदेश पवार, सतीश पवार, तुकाराम दाते, सुमीत पवार, दीपक पवार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली. तर, अरुणा पवार यांनी सुकलवाडी येथील प्रसिद्ध कीर्तनकार माणिकमहाराज पवार यांचे पुतणे अमित पवार, अक्षय पवार, छाया अरुण, अरुण पांडुरंग पवार, शिवाजी पांडुरंग पवार, उज्ज्वला माणिक पवार यांच्याविरुद्ध बेकायदा गर्दी जमवून माझ्या मुलाला मारहाण केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.(वार्ताहर)
सुकलवाडीत दोन गटांत हाणामारी
By admin | Published: April 28, 2017 5:47 AM