पुणे : सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिराती करणाऱ्यावर विद्रूपीकरण कायद्याअंतर्गत कारवाईचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) प्रशासनाने बस, बस स्थानके व बस शेडवर करण्यात येणाऱ्या अनधिकृत जाहिरातींवर कारवाई करण्यासाठी सर्व आगार प्रमुखांवर प्राधिकृत अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र प्रिव्हेंशन आॅफ डिफेसमेन्ट आॅफ प्रॉपर्टी अॅक्ट १९९५ च्या कलम ५ अन्वये सार्वजनिक ठिकाणी जनतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या जाहिराती, लिखाण काढून टाकणे, कोणत्याही परवानगीशिवाय अनधिकृतपणे जाहिरातबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. राज्य शासनाने त्याविषयीचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका व महामंडळांना दिले आहेत. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने बस व बसस्थानकाच्या ठिकाणी स्वच्छतेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यानुसार आगार प्रमुखांवर जबाबदारी देण्यात आली, अशी माहिती जनता संपर्क अधिकारी डी. ए. परदेशी यांनी दिली.
पीएमपी बसवरील अनधिकृत जाहिरातींवर कारवाई
By admin | Published: November 04, 2014 3:47 AM