पुणे: शहरालगतच्या अनधिकृत व धोकादायक असलेल्या इमारतींवर येत्या आठ दिवसांत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी आज येथे दिली.नऱ्हे-आंबेगाव येथील दुर्घटनेनंतर शहरालगतच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी सोमावारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी, नगर रचना विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची बैठक घेतली. यामध्ये प्रशासनाने सन २०१२ मध्ये केलेल्या सर्वेनुसार जिल्ह्यात तब्बल आठ हजार बांधकामे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. या अनधिकृत बांधकाम असणाऱ्या इमारातींपैकी धोकादायक इमारतींवर त्वरित कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रदीप पाटील यांनी दिली. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेऊन जिल्हा परिषद, दोन्ही महानगरपालिकांच्या यंत्रणेच्या मदतीने युद्ध पातळीवर शहरालगतच्या ३८ गावांमध्ये अनधिकृत बांधकामांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनधिकृत बांधकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. तसेच नव्याने तयार होत असलेल्या अनधिकृत रिकाम्या इमारती त्वरित पाडण्यात येणार असून, नागरिक राहत असलेल्या इमारतींना नोटिसा देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी एखादी इमारत धोकादायक असल्याची तक्रार केल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस देऊन अशी बांधकामे पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यापुढे इमारत बांधकामाला परवानगी देतानाच संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून स्ट्रक्टचरल आॅडिटची फी वसूल करून क्रेडाई किंवा अन्य खासगी संस्थांकडून अशा इमारतीचे स्ट्रक्टचरल आॅडिट करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने २०१२ मध्ये केलेल्या सर्वेमध्ये जिल्ह्यात आठ हजार बांधकामे अनधिकृत असल्याचे समोर आले होते. (प्रतिनिधी)
अनधिकृत इमारतींवर आठवड्यात कारवाई
By admin | Published: November 04, 2014 3:47 AM