वारजे : वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत वारजे कर्वेनगर व एरंडवणा प्रभागात आज आकाशचिन्ह विभागाने धडक कारवाई करीत अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड, बॅनर व पोस्टर काढले. तसेच अनेक व्यापारी व दुकानदारांनी वस्तू व नावाचे बोर्ड ठेवून अडवलेले रस्ते व पदपथ कारवाई करीत मोकळे केले.
गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजल्यापासून ही कारवाई वारजे माळवाडी व उड्डाणपूल परिसरातून सुरू झाली. ती प्रभाग ३२, ३१ व संध्याकाळी उशिरापर्यंत प्रभाग १३ मधील कर्वे रस्त्यावर सुरू होती. कारवाईच्या धास्तीने अनेक व्यापाऱ्यांनी आपापले बोर्ड, बॅनर आधीच काढून ठेऊन दिले व अधिकाºयांना सहकाऱ्याची भूमिका घेतली. यात सुमारे ४०० आस्थापना व अनेक लहान-मोठे बॅनर कारवाई करून खाली उतरवण्यात आले. तीन ट्रक व सुमारे २० बिगारी यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई वारजे कर्वेनगर भागातील आकाशचिन्ह निरीक्षक संतोष कुंभार यांच्या नेतृत्वात झाली. कुंभार यांनी याच आठवड्यात या कार्यालयात पदभार स्वीकारला असून त्यांची वारज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.