पुणे : शहरातील मुंढवा परिसरात दहशत पसरवणार्या सराईत मंगेश तांबे टोळीविरुद्ध पोलिसांकडून मोक्का कायद्यातर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेली ही १०७ वी कारवाई आहे. मंगेश बाळासाहेब तांबे (२८, रा. खराडकर पार्क, खराडी), अक्षय कुंदन गागडे (२४, केशवनगर, मुंढवा) आणि कार्तिक भरत गुमाणे (२० ,रा. केशवनगर, मुंढवा) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सराईत गुन्हेगार तांबे याने साथीदारासह संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करुन टोळीचे वर्चस्व ठेवले होते. तांबे याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्याविरोधात खडक, बंडगार्डन, मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. टोळीविरुद्ध मोक्का कारवाईचा प्रस्ताव मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी पोलिस उपायुक्त आर. राजा यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. त्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त आर. राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलिस निरीक्षक सुनिता रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर, उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड, हेमंत झुरूंगे, दिपक कांबळे, रविंद्र देवढे आणि विजय माने यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास हडपसर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख या करत आहेत.