पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अंतर्गत लढाई सुरू झाली असून आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा अजित पवारांकडून सातत्याने केला जात आहे. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडूनअजित पवार गटातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अजित पवारांसह ज्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे. स्वत: शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यानंतर, आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यावर कारवाई करण्यात आलीय.
महाराष्ट्र राज्याच्या विद्यमान महायुती सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी प्रदीप गारटकर उपस्थित राहिले होते. त्यांचे हे कृत्य पक्षशिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्याविरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून व पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे, असे जयंत पाटील यांनी पत्र जारी केले आहे. या पत्राची एक प्रत प्रदीप गारटकर यांना पाठवण्यात आली आहे. तसेच आपणास सूचित करण्यात येत आहे की यापुढे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह इ. वापर करू नये. अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही पक्षातर्फे जयंत पाटील यांच्यावतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीवर दावा केला जात आहे. ३० जूनला राष्ट्रवादीची महत्वाची बैठक झाली. अजित पवारांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली. अजित पवारांची नेता म्हणून निवड झाली. अनिल पाटील यांना प्रतोद म्हणून नेमण्यात आले. आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत, म्हणून आपोआप चिन्ह आणि अन्य विषय असतात ते आम्हाला मिळायला हवेत यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे, असे प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले.