लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन न करणा-यांविरुद्ध पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. नियमभंग करणा-यांविरुद्ध कारवाईमध्ये हात आखडता घेतला जात असल्याबाबत ‘लोकमत’मध्ये बातमी प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरात दंडात्मक कारवाईची मोहीमच हाती घेतली आहे. विविध ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये ८५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर-घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पुणे-मुंबई रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर बस व रेल्वे स्थानक परिसर, जंगली महाराज रस्ता, फर्ग्यूसन महाविद्यालय रस्त्यावरील हॉटेल, मॉल, पानटपरी, मंगल कार्यालय, खासगी मोठी कार्यालये, बँका अशा सार्वजनिक, व्यावसायिक ठिकाणी मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न पाळणे, कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचना न पाळल्याप्रकरणी व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यामध्ये २१ हॉटेल, २ मंगल कार्यालय, २ शॉपिंग मॉल, ३ पानटपरी, ४ मोठ्या दुकानांवर कारवाई करीत १६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
तर, धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये मास्क न वापरणा-या ४१ नागरिकांकडून २० हजार ५०० रुपयांचा तर सामाजिक अंतर न पाळणा-या नागरिकांकडून २ हजार ५०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांकडून ३ हजार ०४० रुपये, तर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या नागरिकांकडून १ हजार २०० अशा एकूण २७ हजार २४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून १९ नागरिकांकडून मास्क न वापरल्याप्रकरणी ९ हजार ५०० रुपये, सामाजिक अंतर न पाळणा-यांकडून २ हजार ८००, ओला व सुका कचरा एकत्र केल्याप्रकरणी ६२०, तसेच अन्य दंड असा एकूण २५ हजार ८४० रुपये दंड वसूल करण्यात आला. येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिका-यांनी 3 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तर, वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाने प्रभाग क्र. २५, साळुंखे विहार रस्ता येथे १४ नागरिकांवर मास्क, ३ नागरिकांवर सामाजिक अंतर न पाळणे, अस्वच्छता करणे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशी एकूण १२ हजार ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, शहरभरात दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे.