पुणे : महापालिकेच्या पावतीचे पैसे स्वत:च्या नावावर घेतल्याने महापालिकेने भाच्याचा टेम्पो संस्पेड केला. याला कारणीभूत असल्याच्या संशयावरून मामावरच कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी प्रवीण देवदास जगधने (वय २८, रा. राजेवाडी) याला अटक केली आहे. जगधने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आहे. याबाबत अभिषण दादू रणदिवे (वय ३८, रा. राजेवाडी) यांनी फिर्याद दिली. ही घटना रणदिवे यांच्या घरात रविवारी दुपारी एक वाजता घडली.
अधिक माहितीनुसार, प्रवीण जगधने याचा टेम्पो पिंपरी चिंचवडच्या हद्दीत वाहतुकीसाठी भाड्याने होता. दोन महिन्यांपूर्वी त्याने महापालिकेची पावती स्वत:च्या नावावर ‘गुगल पे’ने घेतली. हे उघडकीस आल्याने त्याचा टेम्पो तेथून सस्पेंड करण्यात आला. या घटनेला आपला मामा रणदिवे कारणीभूत आहे, असा त्याचा समज झाला होता. त्या रागातून तो रविवारी रणदिवे यांच्या घरी हातात कुऱ्हाड घेऊन आला.
रणदिवे यांच्या पाठीमागून येऊन आता तुला खल्लास करतो, असे म्हणून त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. मी इथला भाई आहे, असे मोठमोठ्याने ओरडून हातातील कुऱ्हाड हवेत फिरवून दहशत पसरवली. समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली असून, सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे तपास करीत आहेत.