कोरेगाव मूळ : तालुक्यात बसून गावाचा कारभार पाहणाऱ्या तलाठी भाऊसाहेबांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. महसूल व वन विभागाने पत्रक काढून खासगी व्यक्ती ठेवून काम पाहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.महसूल प्रशासन आणि जनतेचा दुवा म्हणून तलाठ्यांकडे पाहिले जाते. गावपातळीवर लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी येणारे अनेक गावचे तलाठी भाऊसाहेब तालुक्यात बसून काम पाहत होते. प्रत्येक गावात खासगी व्यक्ती हाताखाली ठेवून त्या व्यक्तींच्या जिवावर अनेक तलाठी गावचा कारभार चालवत असल्याची बाब शासनाच्या लक्षात आल्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महसूल व वन विभागाने ६ जानेवारी २०१७ रोजी पत्रक काढून तलाठ्यांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या जागेत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या दिवशी तलाठी गाव सोडून बाहेर जाणार आहेत त्या दिवसाचा नियोजित दौरा, बैठका, यांबाबतची माहिती कार्यालयाच्या सूचनाफलकावर लिहून बाहेर जावे लागणार आहे. तसेच, तलाठ्यांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या, सूचनाफलकावर लिहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याचबरोबर, स्वत:चा मोबाईल क्रमांक, मंडल अधिकाऱ्यांचा व नायब तहसीलदार यांचाही मोबाईल नंबर सूचनाफलकावर लिहण्यात यावा, असे कळविण्यात आले आहे. सेवा हमी कायद्याअंतर्गत सर्व बाबींची माहिती कार्यालयाच्या आवारात लावण्यात यावी व त्याचप्रमाणे शुल्कआकारणी करावी आणि तलाठी कार्यालयामध्ये खासगी व्यक्तींना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी ठेवू नये. जर खासगी इसमाला कार्यालयीन कामकाज करण्यास ठेवले असता संबंधित तलाठ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे आदेश शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.या प्रशासनाच्या आदेशामुळे गावागावात झिरो कर्मचारी ठेवून उंटावरून शेळ्या राखणाऱ्या तलाठी भाउसाहेबांचे धाबे दणाणले आहे. (वार्ताहर)
भाऊसाहेबांवर होणार शिस्तभंगाची कारवाई
By admin | Published: January 24, 2017 1:36 AM