पुणे : शैक्षणिक शुल्क अथवा इतर काेणत्याही कारणामुळे दहावी तसेच बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हाॅलतिकीट न देणे गंभीर बाब आहे. याप्रकारे शाळांनी विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये. विद्यार्थी, पालकांची तक्रार आल्यास संबंधित शाळांवर परीक्षा झाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिला. तसेच आतापर्यंत आशा स्वरूपाच्या दाेन तक्रारी प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
गाेसावी म्हणाले, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांवर आपण कारवाई करीत असताे. संबंधित प्राथमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि संचालक यांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना हाॅलतिकीट न देणे अत्यंत गंभीर आहे. राज्य मंडळ काेणत्याही कारणामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता गांभीर्याने घेत असते. आतापर्यंत आमच्याकडे दाेन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरवर्षी सरासरी दाेन ते तीन तक्रारी येत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून हे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.
गतवर्षी ११ गुन्ह्यांची नाेंद
परीक्षेदरम्यान गतवर्षी जे गैरप्रकार झाले, त्याबाबत ११ गुन्हे दाखल झाले असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिघात १४४ कलम लागू असते. केंद्राजवळ झेराॅक्स सेंटरही बंद केली जातात. परीक्षेदरम्यान मूळ विद्यार्थी तसेच डमी बसलेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला जातो तसेच मूळ विद्यार्थ्यांस पुढील पाच परीक्षेला बसू दिले जात नाही.
परीक्षेचा निकाल लवकर लावणार
गतवर्षी सुरुवातीचे काही दिवस शिक्षकांचा संप सुरू हाेता, तरीही आम्ही बारावीचा निकाल वेळेवर जाहीर केला हाेता. यंदाही मे च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बारावीचा निकाल लावण्यावर आमचा भर आहे, असेही गोसावी यांनी सांगितले.