पुणे : शहरात एकत्र जमून रस्त्यावरील सिग्नल तसेच घरोघरी दुकानांवर जाऊन जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांसह भिक्षेकऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. जबरदस्तीने पैसे मागितल्याचा प्रकार समोर आल्यास अशा तृतीयपंथी भिक्षेकऱ्यांवर पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
आयुक्त म्हणाले, ‘तृतीयपंथी लोक व भिक्षेकरी नागरिकांच्या कार्यक्रमाच्या, लग्नाच्या ठिकाणी जाऊन, रस्त्यावर सिग्नलला कारच्या काचा बंद असतानाही घरोघरी, दुकानांवर जाऊन जबरदस्तीने पैसे मागत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. याचे वादही विकोपाला गेल्याचे काही घटनांवरून समोर आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी अशा पद्धतीने तृतीयपंथी, भिक्षेकरी लोक पैसे मागत असतील तर त्यांच्या विरोधात खंडणी, बेकादेशीर जमाव, नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करणे अशा विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सूचित केले आहे.
त्यामुळे त्यांना एकत्रित येऊन व वैयक्तिकरीत्या शहरात घरोघरी, दुकानांच्या ठिकाणी, लग्न, उत्सव, वाढदिवस अशा ठिकाणी पैसे मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबरच सिग्नलला, चौकात जबरदस्तीने पैसे मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. १२ एप्रिलपासून हा आदेश लागू करण्यात येणार आहे.