पुणे : शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर, तसेच गर्दीच्या ठिकाणी महिला, तरुणीची छेडछाड करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. पुणे शहर पोलीस दलातील दामिनी पथकाने अशा रोडरोमियाेंविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे. अशा सुमारे साडेपाचशे रोडरोमियाेंच्या विरुद्ध दामिनी पथकाने कारवाई केली आहे.
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात टोळभैरवांकडून येणाऱ्या-जाणाऱ्या मुली, महिला यांची छेडछाड काढली जाते. अनेकदा मुली हा प्रकार घरी सांगत नाही. सांगितला तर आपली शाळा, घराबाहेर पडणे बंद होईल अशी त्यांना भीती वाटत असते. अशा तरुणी, महिलांना आधार मिळावा, यासाठी राज्यातील शहरांमध्ये दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
दामिनी पथकाची रचना
पुणे पोलीस आयुक्तालयातील ३२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दामिनी पथकाची स्थापना केली आहे. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यातील १ महिला मार्शल अशा दोन पोलीस ठाण्याच्या २ महिला मार्शलची जोडी नियुक्त करण्यात आली आहे, अशी १६ दामिनी पथके आहेत. हे पथक पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोलिंग, छेडछाडविरुद्ध कारवाई, पोलीस नियंत्रण कक्षाकडून आलेल्या कॉलनुसार तातडीने घटनास्थळी जाऊन महिलांना मदत करीत असतात. त्याचबरोबरे, शाळा, महाविद्यालयात जाऊन जनजागृती, कार्यशाळांमध्ये भाग घेऊन माहिती देत असतात. याबरोबरच, पोलीस ठाण्यांतर्गत १ महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचारी यांचे दामिनी २ हे पथक स्थापन करण्यात आले आहे.
डायल करा १०९१
महिला यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात १०९१ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर फोन केल्यास महिला मार्शल तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती मदत करीत असतात. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर, २०२१ या वर्षभरात महिला मार्शल यांनी तब्बल ५ हजार ४३६ कॉल ॲटेंड करून मदतीला धावून गेल्या होत्या. गेल्या वर्षभरात दामिनी पथकाने ४२२ विशेष कारवाया केल्या असून, २२१ शाळा, महाविद्यालयांना भेटी देऊन जनजागृती केली.
छेडछाडीचे वाढते प्रकार
२०२० - २६६२०२१ - ३८५
जुलै २२ अखेर - ३१३