पुणे : पाच महिन्याच्या विश्रांतीनंतर धावू लागलेल्या बसचे ब्रेकडाऊन वाढू लागल्याने आता त्याची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) घेतला आहे. दरम्यान, सध्या १०-१२ वर्षांपासून ताफ्यात असलेल्या जुन्या बसच प्रामुख्याने मार्गावर बंद पडत आहेत. त्यामुळे या बसच्या ब्रेकडाऊननंतर नेमकी चुक कोणाची, हे कसे शोधणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लॉकडाऊननंतर पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये ३ सप्टेंबरपासून बससेवा सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मार्गावर बस बंद पडण्याचे सत्र सुरू झाले. लॉकडाऊनपुर्वी दररोज किमान १५० बस मार्गावर बंद पडत होत्या.
मागील पाच महिने बस जागेवरच उभ्या होत्या. त्यांच्या देखभाल दुरूस्तीची कामे केल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातो. पण प्रत्यक्षात पहिल्या पाच दिवसातच १६४ बस मार्गावर बंद पडल्या. सध्या दररोज १९० मार्गांवर सुमारे ४२५ बस सोडण्याचे नियोजन केले जाते. त्यापैकी दररोज किमान ३० बस बंद पडत आहेत. कमी बस असूनही ब्रेकडाऊन होत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेतली आहे.
ब्रेकडाऊन रोखण्यासाठी आगारातील वर्कशॉप कर्मचारी, चालक व अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. त्यापैकी ब्रेकडाऊन जे जबाबदार असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सहव्यवस्थापकीय संचालक चेतना केरूरे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ब्रेकडाऊन रोखण्यासाठी लॉकडाऊनपुर्वीही असे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण त्यामध्ये यश मिळाले नव्हते. बसच जुन्या असतील तर कितीही दंडात्मक कारवाई केली तरी ब्रेकडाऊन रोखता येणार नाहीत, अशी चर्चा पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.