पुणे : नवीन वर्षाचे स्वागत गडकिल्ले, अभयारण्ये किंवा शहरातील टेकड्यांवर जाऊन करायची अनेकांची इच्छा असते. परंतु, वन विभागाकडून तशी परवानगी नाही. त्यामुळे कोणीही अशा ठिकाणी जाऊन नववर्षाचे स्वागत करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वन विभागाने दिला.
दरवर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला (३१ डिसेंबर) निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्टी करण्याची मानसिकता असते. हे लक्षात घेऊन विभागातर्फे संरक्षित गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रात्रभर वन कर्मचारी गस्त घालणार आहेत. तसेच स्थानिक संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कार्यकर्त्यांसह वन विभागाचे कर्मचारी ताम्हिणी, मुळशी, सिंहगड, लोणावळ्यासह पुण्यातील टेकड्यांसह मंगळवारी (दि.३१डिसेंबर) रात्री गस्त घालतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
नागरिकांचे शहराबाहेर, निर्मनुष्य ठिकाणी, जंगलाच्या परिसरात जाऊन पार्टी करण्याचे प्रमाण वाढत आहे. गड-किल्लयांच्या परिसरात, जंगलालगतच्या मोकळ्या माळरानांवर, नदीकिनाऱ्यांवर बेकायदा तंबू टाकून सेलिब्रेशन केले जाते. त्यामुळे वन्यजीवांना त्याचा त्रास होतो. अनेकजण मद्यप्राशन करतात. बाटल्या तिथेच टाकतात. त्यामुळे वन्यजीवांना इजा होण्याचा धोका असतो. तसेच इतरही अनेक गैरप्रकार उघडकीस आल्याने वन विभागाने ३१ डिसेंबरच्या रात्री गस्त वाढवली आहे. जिल्ह्यातील वन क्षेत्राबरोबर मध्यवर्ती पुण्यातील टेकड्यांवर बंदोबस्त राहणार आहे.
खरंतर राखीव वनक्षेत्रात सूर्यास्तानंतर फिरण्यास बंदी आहे. नियमांची माहिती नसल्याने अनेकदा लोक जंगलांत, मोकळ्या माळरानांवर पार्टी करतात. दुर्गम भागात तंबू घेऊन जातात. शेकोट्या पेटवतात. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या वावरावर बंधने येतात. आणि निसर्गाचेही नुकसान केले जाते. त्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील टेकड्या, वन क्षेत्र आणि सिंहगडावर गस्त वाढविण्यात येणार आहे. सिंहगडावर एरवीप्रमाणेच संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. नागरिकांनी याची दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.