पुणे : दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना सांगवी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. संगीता विनाद गायकवाड (वय ४८, सांगवी पोलीस ठाणे) असे या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे.तक्रारदार यांचे पिंपळे गुरव येथील ६० फुटी डीपी रोडवर भाडेतत्वावर दुकान होते. या दुकानाचा करारनामा संपूनही त्यांनी ते खाली न केल्याने मुळ मालकाने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी संगीता गायकवाड यांच्याकडे होती. त्यांनी तक्रारदार यांना दुकान खाली करण्यासाठी मुदतवाढ देते. तसेच मदत करते म्हणून तक्रारदार यांच्याकडे ३ हजार रुपयांची लाच मागितली होती. दुकानदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात संगीता गायकवाड यांनी तडजोड करुन दीड हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पोलीस अधीक्षक राजेश् बनसोडे, अपर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, गिरीश सोनवणे, हवालदार अंकुश माने, श्रीकृष्ण कुंभार, सहायक फौजदार जाधव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात सापळा रचला. तक्रारदाराकडून दीड हजार रुपये स्वीकारतात. संगीता गायकवाड यांना पकडण्यात आले. सांगवी पोलीस ठाण्यात लाच लुचप्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला हवालदार जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2020 3:32 PM