मंचर: दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आंबेगाव तालुक्यातील १०५ पैकी २८ गावांमध्ये कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हलगर्जीपणामुळे वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
दिवाळींनंतर कोरोना नियंत्रणात आला असल्याचे वाटत होते. त्यानंतर अनलॉकची प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने सुरु केली. बाजारपेठा गजबजल्या. लग्न समारंभ, दशक्रिया विधी यांना प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होऊ लागली. नागरिकांच्या तोंडावरचे मास्क गायब झाले. फिजिकल डिस्टन्सिंग कोणी पाळत नव्हते. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. मागील तीन दिवसांत आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. दि. २२ रोजी २१ रुग्ण सापडले, दि, २३ रोजी १५ तर दि. २४ रोजी १२ रुग्ण आढळले आहेत. यावरून कोरोना वाढू लागल्याचे दिसून येते. तालुक्यातील १०५ गावांपैकी २८ गावांमध्ये कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातही मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द या गावांमध्ये दहापेक्षा जास्त रुग्ण असून पेठ गावातसुद्धा रुग्ण वाढले आहेत.
रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करुन जे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले आहेत त्यांची कोरोना टेस्ट करण्यावर भर दिला जात आहे. कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असताना नागरिक अजूनही काळजी घेताना दिसत नाही. अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्क नसतो. शाळा, महाविद्यालय बंद आहेत. मात्र लग्न समारंभ तसेच दशक्रिया विधींना होणारी गर्दी अद्याप पुरेशी कमी झालेले नाही. पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला असला तरी अनेक ठिकाणी लग्नसमारंभ साजरे होत आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण चार हजार ९४६ रुग्ण सापडले आहेत. चार हजार ७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १२१ जणांचा मृत्यू झाला असून ८५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
आंबेगाव तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असून, प्रशासनाने सर्वेक्षण सुरू केले आहे. नागरिकांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्स पाळणे, वारंवार हात धुणे हे नियम पाळले पाहिजेत. शक्यतो गर्दी टाळावी. गावातील दुकानदार, व्यवसायिक, बाजार समितीतील व्यापारी,शहरात भाजीपाला घेऊन जाणारे वाहनचालक यांची कोरोना टेस्ट ग्रामपंचायतीने करावी. ज्याद्वारे सुपर स्प्रेडर शोधून काढता येईल.
डॉ. सुरेश ढेकळे, वैद्यकीय अधिकारी आंबेगाव