मार्केट यार्ड भागात राहणाऱ्या तरुणांनी अन्नदान यज्ञातून निर्माण केलेल्या आगळावेगळ्या आदर्शाची, तरुणाईचा भुकेलेल्यांना मायेचा घास... या शीर्षकाची बातमी काल प्रसिद्ध झाली. सर्व हॉटेल्स बंद, दुकाने बंद असल्यामुळे रस्त्यावरच्या कुटुंबांना, मुलांना खायला काही मिळत नव्हते. तेव्हा थेट गरजूपर्यंत जाऊन हे तरुण अन्नदानाचे श्रेष्ठ कार्य करीत आहेत.
मांजरी भागात राहणाऱ्या योगेश भोसले, संतोष कोतवाल, कुलदीप यादव, योगेश जाधव, नयन महाले, अभिषेक गायकवाड, गणेश कोतवाल, अक्षय गायकवाड, सौरभ केदार, अभिजित गायकवाड, सागर तुपे हे तरुण नेहमीच सामाजिक क्षेत्रात कृतिशील काम करत असतात. स्वतः रक्तदान करून इतरांनाही उद्युक्त करण्याचे काम करत, गरजू रुग्णांना विविध प्रकारची मदतही ही मंडळी करत आहेत. जमा केलेले १०० किलो धान्य व इतर जीवनावश्यक वस्तू त्यांनी हडपसर भागात हिंदवी स्वराज्य युवा संघ या संस्थेचे संस्थापक अभिजित बोराटे यांच्याकडे सुपूर्त केले. ही संस्था भिकारी, निराधार व गरजू लोकांपर्यंत जाऊन अन्नदानाचे कार्य करीत आहे.
प्रतिक्रिया
सगळीकडे नकारात्मक वातावरण असताना ‘लोकमत’चा पॉझिटिव्ह स्टोरी हा वृत्त-उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. कोरोनावर नियोजनबद्धपणे प्रयत्न करून कोरोनामुक्त झालेल्यांच्या कथा मनाला उभारी व प्रेरणा देतात. ‘लोकमत’मधील कालची बातमी वाचून आमच्या मित्रपरिवाराने, येत्या काळात थेट गरजूपर्यंत जाऊन अन्नदान करण्याचा संकल्प केला आहे - योगेश भोसले
----
छायाचित्र ः
हिंदवी स्वराज्य सेवा संघाचे अभिजित बोराटे यांच्या समवेत मांजरी भागातील उपक्रमशील तरुणाई.